Marathi | मराठी Marathi | मराठी

मराठी

| बी.ए.
Language : English |  Marathi

मराठी विषयातील बी.ए. हा मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांतील पदवीस्तरावरील अभ्यासक्रम भाषिक आणि वाङमयीन कौशल्यांवर भर देणारा आहे. मराठी भाषेतील विस्तृत ज्ञानक्षेत्रे विद्यार्थ्यांना खुली करतानाच मराठी भाषेचे समकालीन जागतिक परिप्रेक्ष्यातील स्थान आणि महत्त्व तसेच मराठी भाषेतून उपलब्ध होऊ शकणाऱ्या करिअरच्या विविध संधीही त्यातून अधोरेखित केल्या जातात.

भाषिक कौशल्ये हा यातला कळीचा मुद्दा आहे, जसे की- भाषांतर कौशल्य, सर्जनशील लेखनाचे कौशल्य इत्यादी. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांची विविध लेखनकौशल्ये वाढीस लागावीत, विशिष्ट विषय वा क्षेत्रांतील भाषिक प्रकल्प राबवता यावेत, नवनवी अध्ययनकौशल्ये आत्मसात करून त्यांची वर्ग तसेच वर्गापलीकडील क्षितिजे विस्तारावीत, अशी रचना असलेला हा विद्यार्थीभिमुख अभ्यासक्रम आहे.

अभ्यासक्रम

प्रथम वर्ष (सत्र पहिले)
मराठी आवश्यक

निवडक मराठी गद्य, व्यावहारिक मराठी (निबंध लेखन, सूत्रसंचालनाची लिखित संहिता, अर्जलेखन, पत्रलेखन, वृत्तांत लेखन.)

मराठी (ऐच्छिक)

वाङमय म्हणजे काय, वाङमयप्रकार म्हणजे काय, नाटक म्हणजे काय, नाटकाचे वर्गीकरण, नाट्यछटा, बतावणी, एकांकिका, पथनाट्य, स्वगत – यांचा परिचय व या प्रकारांतील एकेका संहितेचा अभ्यास- ३ नाट्यछटा, वसंत सबनीसांची बतावणी, वि. वा. शिरवाडकरांच्या नटसम्राट नाटकातील स्वगत, गमभन ही एकांकिका, शिक्षणविषयक प्रश्नांवर आधारित पथनाट्य.

प्रथम वर्ष (सत्र दुसरे)
मराठी आवश्यक

निवडक मराठी पद्य, व्यावहारिक मराठी (मराठीतून इंग्रजी वा हिंदीत व हिंदी वा इंग्रजीतून मराठीत भाषांतर, मुलाखतीसाठी प्रश्नावली, घोषवाक्यलेखन, उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.)

मराठी (ऐच्छिक)

मराठी रंगभूमीचा परिचय- प्रकार व इतिहास, दोन नाटकांचा अभ्यास- वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते, आणि राजकुमार तांगडे लिखित शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला.

द्वितीय वर्ष (सत्र तिसरे)

कथनात्म साहित्य म्हणजे काय, कथा व वादंबरी या प्रकारांचा परिचय, विविध लेखकांच्या ४ निवडक कथा तसेच मुरलीधर खैरनार लिखित शोध या कादंबरीचा अभ्यास.

भाषा म्हणजे काय, मानवेतर प्राण्यांची भाषा, मानवी भाषेची स्वरूपवैशिष्ट्ये, व्यवहारभाषा, शास्त्राची भाषा व साहित्याची भाषा यांतील फरक, भाषेची संरचना व भाषेची कार्ये, भाषाअभ्यासाची विविध क्षेत्रे.

द्वितीय वर्ष (सत्र चौथे)

चरित्र-आत्मचरित्र व्यक्तिचित्रे व आत्मकथा या प्रकारांचा परिचय, निवडक व्यक्तिचित्रांचा अभ्यास, आत्मकथनातील निवडक अंश.

भाषाकौशल्य म्हणजे काय, विविध भाषाकौशल्यांचा परिचय, मूलभूत भाषाकौशल्ये- श्रवण, बोलणे, लेखन व वाचन, आधुनिक भाषाकौशल्ये व त्यांचा विविध करिअरशी असलेला संबंध.

तृतीय वर्ष (सत्र पाचवे)

मराठी भाषेची सुरूवात, ताम्रपट-शीलालेख व आद्यग्रंथ, महानुभाव पंथ, वारकरी पंथ व अन्य पंथांतील लेखनाचा व कार्याचा परिचय, ख्रिश्चन-मुस्लीम व जैनधर्मीयांचे मराठी लेखन.

भारतीय साहित्यशास्त्रातील ठळक सिद्धांत व संकल्पनांचा परिचय, वाङमयीन भाषेचे स्वरूप, निर्मितीप्रक्रिया व लेखनहेतू – याविषयीच्या संकल्पनांचा परिचय.

समाज आणि साहित्य याविषयी विविध सिद्धांतने. कादंबरी, कविता यांचा वरील सिद्धांतांच्या संदर्भांत अभ्यास. .

समाजभाषाविज्ञान म्हणजे काय, भाषासंपर्क, भाषावैविध्य, भाषाविकास व भाषिक ऱ्हास, भाषिक धोरणे आणि भाषेसमोरील आव्हाने.

लेखकअभ्यासाची संकल्पना, अरूण साधू यांच्या विशेष संदर्भात त्यांच्या २ कलाकृतींसह लेखकाभ्यासाची संकल्पना स्पष्ट करणे.

भाषांतर म्हणजे काय, भाषांतराचे प्रकार, भाषांतरकाराकडील विविध कौशल्ये, भाषांतराचा भाषा-समाज-संस्कृती व शैली यांच्याशी असलेला संबंध, मराठीतून इंग्रजी वा हिंदीत व इंग्रजी वा हिंदीतून मराठीत प्रत्यक्ष भाषांतर. भाषांतर क्षेत्रातील विविध व्यवसायसंधी.

तृतीय वर्ष (सत्र सहावे)

पंडिती काव्य, शाहिरी काव्य, बखर गद्य, मध्ययुगीन मराठी वाङमयातील ठळक लेखनप्रकार, मध्ययुगीन मराठी वाङमयाचे ऐतिहासिक मूल्यमापन.

पाश्चात्य साहित्यशास्त्रातील ठळक सिद्धांत व संकल्पनांचा परिचय, वाङमयीन भाषेचे स्वरूप, निर्मितीप्रक्रिया व लेखनहेतू – याविषयीच्या संकल्पनांचा परिचय.

समाज आणि साहित्य याविषयी विविध सिद्धांतने. आत्मचरित्र, लघुकथा यांचा वरील सिद्धांतांच्या संदर्भांत अभ्यास.

मराठी व्याकरण- शब्दांचे वर्गीकरण–पारंपरिक व आधुनिक, विकरण-लिंग,वचन,विभक्ती व आख्यात, शब्दसिद्धी आणि प्रकार, प्रयोगविचारआणि प्रकार.

अरूण साधू यांच्या विशेष संदर्भात त्यांच्या ४ कलाकृतींसह लेखकाभ्यासाची संकल्पना स्पष्ट करणे.

सर्जनशील लेखन म्हणजे काय, या क्षेत्रातील विविध व्यवसायसंधी, कथालेखन, प्रसंगलेखन, नाट्यप्रसंगलेखन, चित्रपटप्रसंगलेखन, कवितालेखन, ललितलेखन. थोडक्यात, वरील अभ्यासक्रम व उपक्रमांच्या आधारे, मराठी विभाग विद्यार्थ्यांमध्ये काही गोष्टी विकसित व्हाव्यात, यासाठी पुढील सूत्रांवर भर देतो-

  • साहित्य व साहित्यप्रकारांचा परिचय.
  • भाषिक तसेच वाङमयीन क्षमता.
  • भाषिक कौशल्यांचा परिचय.
  • कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा, कार्यक्रम वा उपक्रम.
  • पुस्तकाबरोबरच ज्ञानाची जगण्याशी सांगड.

आमचे भूषणावह माजी विद्यार्थी

मराठी प्रबोधन

मराठी प्रबोधन हा मराठी विभागाचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत कला-सांस्कृतिक मंच आहे. या अंतर्गत अभ्यासाशी संबंधित तसेच अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले जाते. जसे की- दर शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला सुमारे ७० विद्यार्थी कलावंतांचा सहभाग असलेला मराठी प्रबोधनचा उद्घाटनपर सादरीकरणात्मक मंचीय सांस्कृतिक कार्यक्रम, १० महाविद्यालयीन तसेच ३ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, महाविद्यालयीन तसेच महाविद्यालयाबाहेरील विविध मंचांवरील व उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन, तिळगुळ समारंभ, मराठी भाषा दिवसाचे आयोजन, विविध स्वयंसेवी संस्थासमवेत सामाजिक-सास्कृतिक जाणिवा विकसित करणारे कार्यक्रम तसेच कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा, मराठी चित्रपट महोत्सव- इत्यादी. अन्य शैक्षणिक संस्था तसेच माध्यम संस्थांच्या सहकार्यानेही विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

याशिवाय, मराठी विभागाच्या माध्यमातूनही विविध शैक्षणिक उपक्रम विशेषत्वाने राबवले जातात. जसे की- मान्यवरांची विशेष व्याख्य़ाने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, विद्यार्थी लिखित व विद्यार्थी संपादित आशय नियतकालिकाचे प्रकाशन, पुस्तक प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती, ग्रंथालये व पुस्तकाच्या दुकानांना भेटी, माध्यमांच्या कार्यालयांना भेटी, चित्रपट प्रदर्शन- इत्यादी.

उद्दिष्टे

या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे-

  • भाषिक तसेच वाङमयीन कौशल्यांचा विकास.
  • या कौशल्यांच्या आधारे करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे.

(सर्वसाधारणपणे भाषा अभ्यासक्रमांतून पुढीलप्रकारची भाषिक कौशल्ये विकसित केली जातात- संभाषण कौशल्य, वक्तृत्व कौशल्य, निवेदन कौशल्य, श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, माहितीचे योग्यरीतीने मूल्यमापन व विश्लेषण, चर्चांतून सहभाग, नेमकेपणाने अर्थ पोहोचवणे, सादरीकरण, बारीकसारीक तपशीलांवर भर, आत्मविश्वास वाढविणे..इत्यादी)