Master of Arts

Marathi | M.A. Marathi

मराठी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम अर्थात एम.ए. मराठी हा दोन वर्षांचा व एकुण चार सत्रे असलेला मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांतील अभ्यासक्रम आहे. भाषिक आणि वाङमयीन जाण वाढविणारा असा हा अभ्यासक्रम आहे. मराठी भाषेतील विस्तृत ज्ञानक्षेत्रे विद्यार्थ्यांना खुली करतानाच मराठी भाषेचे समकालीन जागतिक परिप्रेक्ष्यातील स्थान आणि महत्त्व तसेच मराठी भाषेतून उपलब्ध होऊ शकणाऱ्या करिअरच्या विविध संधीही त्यातून अधोरेखित केल्या जातात.

विद्यार्थ्यांची विविध लेखनकौशल्ये वाढीस लागावीत, विशिष्ट विषय वा क्षेत्रांतील भाषिक प्रकल्प राबवता यावेत, नवनवी अध्ययनकौशल्ये आत्मसात करून त्यांची वर्ग तसेच वर्गापलीकडील क्षितिजे विस्तारावीत, अशी रचना असलेला हा विद्यार्थीभिमुख अभ्यासक्रम आहे.

show more... show less...
Language : English |  Marathi

Key Information

अभ्यासपद्धती

व्याख्यानांबरोबरच विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणाऱ्या विविध अभ्यासपद्धतींचाही अवलंब केला जातो. जसे की, प्रश्नोत्तर सत्रे, गटचर्चा, विचारमंथन, गटप्रकल्प, व्यक्तिगत अथवा गटकृती, चाचणी परीक्षा, तोंडी परीक्षा, सादरीकरण-इत्यादी.

उद्दिष्टे

या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे-

  • चिकित्सक दृष्टी विकसित करणे.
  • भाषाअभ्यासाद्वारे भाषिक क्षमतांचा विकास.
  • वाङमयीन अभ्यासाद्वारे वाङमयीन क्षमतांचा विकास.
  • संदर्भांसह विषय सखोल समजून घेण्याची दृष्टी विकसित करणे.

ठळक टप्पे

१९६० : महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच, १९६० साली, मराठी विभागाचाही पाया घातला गेला. पदवी स्तरावर संपूर्ण मराठी शिकविणारा हा मुंबईच्या महाविद्यालयांतील जुना व समृद्ध विभाग आहे.
२०२० : एम. ए. मराठी हा पदव्युत्तर स्तर २०१९-२०२० साली सुरू केला गेला.

अभ्यासक्रम

पहिले वर्ष (सत्र पहिले)

साहित्य हे सामाजिक-सांस्कृतिक घटीत असते, याचे भान निर्माण करीत सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींशी असलेले साहित्याचे नाते उलगडत वाङमयीन इतिहासाला असलेला सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट करणारी ही अभ्यासपत्रिका आहे. आधुनिक काळातील प्रारंभिक कालखंड म्हणून १८१८ ते १९२० या कालखंडातील मराठी साहित्य व त्याचे सांस्कृतिक संदर्भ यांचा अभ्यास या अभ्यासपत्रिकेत अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील आधुनिकपूर्व वातावरण व मराठी साहित्य, ब्रिटीश राजवटीचे विविध परिणाम – वाङमयेतर व वाङमयीन, जसे की ग्रंथमुद्रण, प्रकाशन, ज्ञानसाधने, नियतकालिके...इत्यादी, भाषांतरयुग व प्रबोधनयुग - सुधारणावादी चळवळी व साहित्य यांचा अभ्यास.

साहित्याची प्रकृती व स्वरूप (विविध परंपरांमधील विविध साहित्यव्याख्या, साहित्यकृतीची विविध अंगे-विस्ताराने चर्चा, साहित्यकृतीतील अनुभवाची काही वैशिष्ट्ये- आत्मनिष्ठा, सेंद्रिय एकात्मता, भाषेची वैशिष्ट्यपूर्णता, विशिष्टता आणि सार्वत्रिकता, साहित्याचे माध्यम व साधन यांतील फरक, साहित्याचा घाट) यांची चर्चा करतानाच लौकिकतावादी व स्वायत्ततावादी भूमिकांच्या अनुषंगाने साहित्याचे प्रयोजन व मूल्यविचार स्पष्ट करणे, साहित्य आणि इतर कला यांतील परस्परसंबंध स्पष्ट करणे तसेच साहित्यातील प्रवृत्ती व वाद – जसे की, अभिजाततावाद, रोमॅन्टिसिझम, वास्तववाद, संरचनावाद- या संकल्पनांचे स्पष्टीकरण.

भाषाविज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करीत ऐतिहासिक भाषाविज्ञानाची मूलतत्त्वे, भूमिका व पद्धती समजून घेणे तसेच वर्णनात्मक भाषाविज्ञानातील स्वनपरिवर्तन, अर्थपरिवर्तन व संरचनावादी भाषाविज्ञान:स्वन-पद-वाक्य-अर्थविचार आदी संबंधित संकल्पनांचा परिचय करून देणे.

आधुनिकतेची संकल्पना व स्वरूप स्पष्ट करीत विविध कलाकृतींच्या विश्लेषणातून आधुनिकतेचे स्वरूप उलगडणे हा या अभ्यासपत्रिकेचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने माणूस ही मनोहर तल्हार लिखित कादंबरी, किडलेली माणसे (कथा) गंगाधर गाडगीळ व जानकी देसाईचे प्रश्न (कथा) विजया राजाध्यक्ष या दोन कथा व बा.सी.मर्ढेकर, अनिल, आरती प्रभू, दया पवार, प्रभा गणोरकर यांच्या प्रत्येकी एका कवितेचा अभ्यास.

पहिले वर्ष (सत्र दुसरे)

साहित्य हे सामाजिक-सांस्कृतिक घटीत असते, याचे भान निर्माण करीत सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींशी असलेले साहित्याचे नाते उलगडत वाङमयीन इतिहासाला असलेला सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट करणारी ही अभ्यासपत्रिका आहे. आधुनिक काळातील प्रारंभिक कालखंड म्हणून १९२० ते १९६० या कालखंडातील मराठी साहित्य व त्याचे सांस्कृतिक संदर्भ यांचा अभ्यास या अभ्यासपत्रिकेत अपेक्षित आहे. त्यांत गांधीवाद,समाजवाद,साम्यवाद,मार्क्सवाद, फुले-आंबेडकरी चळवळ, दुसरे महायुद्ध, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ – इत्यादी संदर्भांच्या अनुषंगाने मराठी साहित्याचा परिचय अपेक्षित आहे.

समीक्षेचे स्वरूप व समीक्षेची उद्दिष्टे स्पष्ट करीत व विविध साहित्यसमीक्षापद्धतींचा परिचय करून देत विविध कलाकृतींच्या विश्लेषणातून विशिष्ट साहित्यसमीक्षापद्धतीचे स्वरूप उलगडणे, हा या अभ्यासपत्रिकेचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने, समीक्षेचे स्वरूप व समीक्षेची उद्दिष्टे समजून घेणे, रूपवादी, मानसशास्त्रीय, शैलीवैज्ञानिक व आदिबंधात्मक, समाजशास्त्रीय, मार्क्सवादी आदी समीक्षापद्धतींचा परिचय करून घेत सावल्या हे चेतन दातार लिखित नाटक व कार्यकर्ता ही उर्मिला पवार लिखित कथा यांचे उपयोजन करणे.

सामाजिक भाषाविज्ञानाची स्वरूप व व्याप्ती उलगडतानाच सामाजिक भाषाविज्ञान आणि बोलीविज्ञान, बोलीभाषांच्या अभ्यासाची गरज, भाषाभेद व भाषिक सापेक्षतावाद (भाषिक वर्तन, स्त्रियांची व पुरूषांची भाषा. वयोगटानुसार भाषा), भाषा व विविध सामाजिक संस्था ( भाषा व कुटुंबव्यवस्था, भाषा व जातिव्यवस्था, भाषा व अर्थव्यवस्था, भाषा व सांस्कृतिक व्यवस्था) आदी संकल्पनांच्या अनुषंगाने समाजभाषाविज्ञान सोदाहरण समजून घेणे.

आधुनिकतेच्या संदर्भात जागतिकीकरणाची संकल्पना व स्वरूप स्पष्ट करीत विविध कलाकृतींच्या विश्लेषणातून आधुनिकतेचे स्वरूप उलगडणे, हा या अभ्यासपत्रिकेचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने चाहुल हे प्रशांत दळवी लिखित नाटक,गोष्ट नाही ही श्याम मनोहर लिखित तर फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ही जयंत पवार लिखित कथा, तसेच अरूण काळे, लोकनाथ यशवंत, प्रज्ञा दया पवार, वीरधवल परब, अजय कांडर यांच्या प्रत्येकी एक अशा एकुण पाच कवितांचा अभ्यास.

दुसरे वर्ष (सत्र तिसरे)

दलित व स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा, संकल्पना व स्वरूप समजून घेत दोहोंचा मराठी साहित्यातील प्रवास स्पष्ट करणे तसेच दलित व स्त्रीवादी प्रवाहातील निवडक साहित्यकृती म्हणून ऐन आषाढात पंढरपुरात- संजय पवार (मराठी दलित एकांकिका- संपा. दत्ता भगत, साहित्य अकादमी) व आरपार लयीत प्राणांतिक (दीर्घकविता) – प्रज्ञा दया पवार (लोकवाङमयगृह) या साहित्यकृतींचा अभ्यास करणे.

एकोणिसाव्या शतकातील गद्याने महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा पाया घातला. प्रातिनिधिक स्वरूपात, महात्मा जोतीराव गोविंदराव फुले, तुकाराम तात्या पडवळ, बाबा पदमनजी, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्या निवडक लेखांचा अभ्यास.

प्रसारमाध्यमांचे स्वरूप (प्रसारमाध्यमे म्हणजे काय-त्याचा समाजावर होणारा परिणाम, पारंपरिक प्रसारमाध्यमे व आधुनिक प्रसारमाध्यमे- विकास व प्रभाव) समजून घेत पारंपरिक प्रसारमाध्यमे म्हणून किर्तन, भारूड, पोवाडा, तमाशा, नाटक आदी माध्यमे तसेच मुद्रित माध्यमे म्हणून वृत्तपत्रे, अन्य नियतकालिके, पुस्तके, पत्रके आदी माध्यमांतील त्यांच्या भाषारूपांचा उदाहरणांसह परिचय.

साहित्यप्रकाराचा संकल्पना अर्थात साहित्यप्रकारांच्या वर्गीकरणामागील तत्त्वे व प्रमुख साहित्यप्रकारांचा परिचय करून घेत अन्य साहित्यप्रकारांशी कवितेचे साम्यभेदात्मक नाते स्पष्ट करणे, कवितेचा पद्यबंध, नादरूप व दृश्यरूप तसेच कवितेचा आशयबंध व विविध भाषिक विशेष आदी संकेतव्यूहांना अनुसरून निवडक २० कवितांचा अभ्यास.

दुसरे वर्ष (सत्र चौथे)

ग्रामीण व महानगरी साहित्याच्या प्रेरणा, संकल्पना व स्वरूप समजून घेत दोहोंचा मराठी साहित्यातील प्रवास स्पष्ट करणे तसेच ग्रामीण व महानगरी प्रवाहातील निवडक साहित्यकृती म्हणून हंडाभर चांदण्या – दत्ता पाटील (मराठी एकांकिका-संपा. डॉ. शिरीष लांडगे व इतर, पद्मगंधा प्रकाशन) व काय डेंजर वारा सुटलाय- जयंत पवार (अक्षर प्रकाशन, मुंबई) या साहित्यकृतींचा अभ्यास करणे.

विसाव्या शतकातील महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण समजून घेण्याच्या दृष्टीने प्रातिनिधिक स्वरूपात, पांडुरंग सदाशिव साने, श्रीधर व्यंकटश केतकर, वि दा सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, में.पुं. रेगे व वसंत पळशीकर यांच्या निवडक लेखांचा अभ्यास.

विविध आधुनिक प्रसारमाध्यमे म्हणून श्राव्यमाध्यम – नभोवाणी, दृक्श्राव्य माध्यमे - चित्रपट व दूरचित्रवाणी, डिजिटल माध्यमे - इंटरनेट व विविध समाजमाध्यमे यांचा माध्यम म्हणून परिचय करून घेत त्या माध्यमांतील त्यांच्या भाषारूपांचा उदाहरणांसह अभ्यास.

मराठी कवितेची वाटचाल समजून घेताना त्यातील अभिजाततावाद, रोमॅन्टिसिझम, प्रतीकवाद, आधुनिकता..यांचा परिचय करून घेणे, मध्ययुगीन तसेच आधुनिक मराठीतील काव्यरूपे व प्रकारांचा परिचय करून घेणे व या अनुषंगाने १ मध्ययुगीन कवी व ३ आधुनिक कवी यांच्या प्रत्येकी पाच यांप्रमाणे एकुण निवडक २० कवितांचा अभ्यास.

फरकाचे मुद्दे

  • कौशल्य आणि करिअर यांवर भर देणारा दृष्टिकोन.
  • कालसुसंगत व प्रस्तुत अभ्यासक्रम.
  • विविध वाङमयीन संस्था व प्रसारमाध्यमे यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन.
  • मराठी प्रबोधन अंतर्गत अभ्यासाशी संबंधित तसेच अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले जाते. जसे की- दर शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला सुमारे ७० विद्यार्थी कलावंतांचा सहभाग असलेला मराठी प्रबोधनचा उद्घाटनपर सादरीकरणात्मक मंचीय सांस्कृतिक कार्यक्रम, १० महाविद्यालयीन तसेच ३ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, महाविद्यालयीन तसेच महाविद्यालयाबाहेरील विविध मंचांवरील व उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन, तिळगुळ समारंभ, मराठी भाषा दिवसाचे आयोजन, तसेच कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा, मराठी चित्रपट महोत्सव- इत्यादी. अन्य शैक्षणिक संस्था तसेच माध्यम संस्थांच्या सहकार्यानेही विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • मराठी विभागाच्या माध्यमातूनही विविध शैक्षणिक उपक्रम विशेषत्वाने राबवले जातात. जसे की- मान्यवरांची विशेष व्याख्य़ाने, लेखक भेटी, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, विद्यार्थी लिखित व विद्यार्थी संपादित आशय नियतकालिकाचे प्रकाशन, पुस्तक प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती, ग्रंथालये व पुस्तकाच्या दुकानांना भेटी, माध्यमांच्या कार्यालयांना भेटी, चित्रपट प्रदर्शन- इत्यादी.